Sanket Tambare

← Micro Blog

#१३१६ समुद्र किनाऱ्यावरील ती एक सुंदर रात्र…! समोर निळाशार फेसाल पा…

Posted
2023-05-13
Type
text

#१३१६ समुद्र किनाऱ्यावरील ती एक सुंदर रात्र…! समोर निळाशार फेसाल पाणी, लुकलुकणारे तारे, सतत कोसळणाऱ्या अवाढव्य फेसाळ लाटा, रात्रीची भग्न शांतता, दुरून येणारा रात किद्यांचा आवाज, सळसळणारी पाने, हवेची थंड झुळूक, नजर जाईल तिथपर्यंत दिसणारं भव्य आकाश, दूर क्षितिजापर्यंत दिसणारं निळाशार पाणी, मध्येच दिसणारा एखादा तुटता तारा, आणि बेधुंद असा धडकणाऱ्या लाटांचा आवाज, सोबत काही खास आणि बरंच काही…! सगळं काही मनमोहक, अगदी संमोहित करणारं, मनात खोल रुतलेल्या द्वैत-अद्वैत भावनांना जागवणार! असंख्य दिसणाऱ्या ताऱ्यांमध्ये कधीतरी भेटलेले तारे देखील असतात, ज्यांच्या अस्तित्वाने आठवणी अगदी क्षणात मोहक होतात अशा पण काही तारा-तारका जाणवतात किंबहुना त्या स्वतःच मनाला खुणावतात हे म्हणणे देखील वावगे ठरणार नाही! हेही तितकंच खरं, सर्वच तारका सर्वकाळ तेवढ्याच चमकत नाहीत, काळानुरूप त्यांच्या स्वयं प्रकाश कधी काळी काहीच नसला तरी आज मात्र त्या किंबहुना त्या पुंजक्यामध्ये त्यांची स्वतःची एक वेगळी ओळख दिसते! हे सर्व तारा - तारका बघताना एक प्रश्न बहुतांश वेळा अनुत्तरीतच राहतो, यातला मी नेमका कोणता तारा असेल बरं? प्रत्येकाचे स्वतःचे अवकाश जरी वेगळं असलं तरी आपण खरचं त्यातल आपलं चमकण किती गौण आणि किती महत्वाचं, हा तसा पुढचा मोठा प्रश्न असावा किंबहुना तो आपल्या हातात देखील नाही, पण तूर्तास माझ्या स्वतःच्या अवकाशात माझे सद्य स्थान कोणतं हा प्रश्न राहतोच ना? मग डोळ्यासमोर येतात मनातली वादळ, स्वतःच्याच निर्णयाशी स्वतःच घातलेल्या हुज्जती, कळत नकळत आलेले मानसिक, बौद्धिक, आणि डिजिटल अडथळे; कैक अस्थिर रात्री आणि या सर्वातून जाऊन स्वतःची एक वेगळी पायवाट चालण्याचा केलेला प्रयत्न, त्यामध्येच केलेल्या प्रयत्नांना मिळालेली दाद, आणि त्यातून मिळालेले प्रोत्साहन…! मधूनच विचारांच्या तंद्रीत आपण एखादया समुद्रात भरकटलेल्या बोटीवरचे प्रवासी/ कॅप्टन तर नाही ना आणि लुक-लुकनारे तारे चल- अचल स्वप्नातील एक पात्र? भरकटणारी बोट तिच्या गंतव्य किनारी लागेल की नाही हे सांगणं तसं अवघडच, पण ती योग्य दिशेला जातेय ना, एवढं तरी आपल्या हातात आहे ना? खवळलेल्या समुद्रात समोर दिसणाऱ्या लाटांवर जास्त लक्ष द्यायचं की अवकाशातून खूनवणाऱ्या तारकांकडे हे त्याचे त्याचे त्याने पहावे! आणि, तिथेच स्वप्नातल्या स्वैर अवकाशात गुडूप झालेलं मन आणि तसेच पहुडलेल शरीर…! #१३:०५:२०२३::१२:४६:am

Tags: #marathi, #nightsky, #travel