Sanket Tambare

← Micro Blog

#१३२० रोजच्या झलाळीच्या पलीकडे बघितलं की, निरभ्र अवकाशातील ताऱ्यांप…

Posted
2023-06-02
Type
text

#१३२० रोजच्या झलाळीच्या पलीकडे बघितलं की, निरभ्र अवकाशातील ताऱ्यांप्रमाने अंधुक आयुष्यातील काही लुकलुकणारे क्षण, आठवणी, खोल कुठेतरी आत दडलेल्या सुंदर गोष्टी दिसतात. दैनंदिन दिनक्रमात कुठेतरी स्वतः मधले स्वत्व जपणाऱ्या गोष्टी जपणे तसे कठीण, बहुदा अशक्यच! दुसऱ्या गोष्टींचा कल्लोळ इतका की आतला आवाज, स्वत्व कधी दबत, किंबहुना लपत हे काळाच्या ओघात जाणवत देखील नाही. एखाद्या रात्री एकल मन जेव्हा उत्कट होऊन त्या लपलेल्या मनातील ताऱ्यांचा जेव्हा मागोवा घेतं, तेव्हा हेच तारे मन प्रफुल्लित करतात. भरकटलेल्या मनाला अगदी अलगद मोकळं करतात, गोष्टी स्पष्ट दिसल्या की अडथळे पण दुरावतात किंवा त्यांना पार करण्याची एक नवी उर्मी मनात निर्माण करतात. दिवसा कठीण वाटणाऱ्या, चल- बिचल करणाऱ्या गोष्टी मग अगदी सोप्या होतात. एखादी गोष्ट करणे महत्वाची आहे हे जाणून सुद्धा ती गोष्ट पुढं धकलनाऱ्या मनाला थोडा लगाम बसतो. इतरत्र धावणारे मन, जरा स्थिरावत! पुढच्या टप्प्यावर दिसणारा तो निरभ्र प्रकाश मग आपसूकच उत्साह पेरत जातो. आणि दमलेले, थकलेले, जरा भरकटलेले मन आपल्या मार्गी मार्गस्थ होते! #मन #रात्र #तारे #२:०५:२०२३::०२:२२:am

Tags: #marathi, #nightsky, #मन, #self-reflection