#1356 विजय तेंडुलकरांची नाटके तशी समाजाला आरसा दाखवणारी असतात. तब्ब…
- Posted
- 2025-11-02
- Type
- photo
#1356 विजय तेंडुलकरांची नाटके तशी समाजाला आरसा दाखवणारी असतात. तब्बल २५ वर्षांनंतर पुण्यात बालगंधर्व मध्ये सयाजी शिंदेंनी साकारलेले ही कलाकृती; अगदी २ तासात, समाजातील विविध स्तर इतक्या तरलतेने रंगमंचावर आणि मनाच्या पटलावर असे उमटतात की मन भारावून जाते. सखाराम तसा साधा माणूस पण व्यवस्थेविरुद्ध, समाजाविरुद्द ठाम उभे राहण्याची त्याची वृत्ती वाखाणण्याजोगी नक्कीच आहे. व्यक्ती, प्रवृत्ती, देव, लग्न, समाज, स्त्री अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत परिस्थिनुरूप बदलणारी माणसे; सखाराम, चंपा, लक्ष्मी यांच्या माध्यमातून बदलणाऱ्या भूमिका; आणि बरंच काही सांगणारी ही कलाकृती! कोसला वाचताना खंडेराव बनून बघण्याची जशी दृष्टी मिळते, तसेच सखाराम प्रमाणे प्रामाणिकपणे जगणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेली वादळे पाहून, आपल्याभोवती अशी वादळे असतील काय असा प्रश्न पडतो! ही गोष्ट लक्ष्मी आणि चंपा यांची पण आहे, व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या २ स्त्रिया व त्यांच्या आयुष्याचे अंतरंग पाहून, संवेदनशील मन अशा भावनांचा कदाचित विचार करण्यास तरी नक्कीच सुरुवात करेल. थोडक्यात, मानवी भाव भावनांना गुंफून एक गुंतागुंतीचे आयुष्य त्रयस्थपणे बघत त्याचे वेगवेगळे पैलू उलगडत आत्म–परीक्षण करण्याची संधी हे नाटक नक्की देते! संधी मिळाल्यास नक्की पाहा! #02:11:2025::02:18:am
Tags: #marathi